गुरुवार, 27 दिसंबर 2018

लावणी sms

*एस एम एस होऊ दे व्हायरल नवा*

अंगात वारं भरलंय माझ्या
पिरतीचा उठलाय धुव्वा,
प्रेमाचं पाणी, सोळाची ज्वानी
करी मनाची घालमेल जव्हा,
साऱ्या जगात आपलीच हवा....
*न् एस एम एस होऊ दे व्हायरल नवा || धृ ||*

तुझ्या भे टी ची.... लागताच मनाला आस,
तू रं पो र गा.... वाटतूया भलताच खास,
तुझे गोड गोड बोल, शिरती मनात खोल....
वाटे जपून हृदयात ठेवा || १ ||

तुझ्या स्टाईलची पोरास्नी झालिया बाधा,
तू रं किसन माझा मी तुझ्या दिलाची राधा,
तुझा रं हेवा वाटतोय जिवा
असा मधुर वाजताच पावा || २ ||

एक मॅसेज गं सारखा करतोय सर्कल मंधी,
सदा म्हणतुया ह्यो नवाय मार्केट मंधी,
अहो समजा हो थोडे  हे दलाली घोडे....
तुम्हा लुटायचा करत्यात कावा || ३ ||

©गीतकार :-
शिवा चौधरी
कळमसरेकर
जामनेर,जळगांव
९९१४३२०२५७

बुधवार, 27 सितंबर 2017

लेक वाचवा गीत

स्पर्धेसाठी......

*विषय :- लेक वाचवा*

बाई शिवाय तुझ्या रे,
नाही अर्थ या जीवना
अरे ए........ माणसा,
लेकं; वाचवूनी दावना
या पृथ्वी तलावरती
स्वर्ग ले की त पाह्यना
अरे ए........ माणसा,
लेकं; वाचवूनी दावना -2 ||धृ||

या जगात जगण्याचा
हक्क देई आई तुला
तुला ठोकर लागता
म्हणे सांभाळ रे मुला
अशा प्रेमळ मायेच्या
नको दुखवू तू भावना || 1||

काय हवं तुला नको
सारं बहीण जाणते
तुझ्या जीवनी आनंद
एक मैत्रीण ही देते
अशा मैत्रीची माणसा
जरा जाण तू ठेवणा || 2 ||

घरं दारं सांभाळते
तुझी होऊन साऊली
तुला बाबा होण्याचा
हक्क देते रे माऊली
त्या पत्नीतली लेकं
जरा विवेकानी पाहना || 3||

जेव्हा थकूनी भागूनी
असा येतोस रे घरा
वारा घालीत म्हणते
जरा आराम हो करा
माया इवल्या लेकीची
कुण्या बटव्यात मावंना || 4||

ताई आत्या मामी मावशी
नाते बाईचे अनेक
तुला हवीय का मादी
का नकोय रे लेकं
नको खुडू कळी गर्भी
जरा माणूसपण दावना ||5||
अरे ए........ माणसा,
लेकं; वाचवूनी दावना.
अरे ए........ माणसा,
लेकं; वाचवूनी दावना.

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
    _9592487310_

गुरुवार, 20 जुलाई 2017

उसवलेलं जीवन

उसवलेलं जीवन

उसवलेल्या जिवनाला ,
टाके घालायला वेळ नाही.
दोन वेळच्या भाकरीचा,
नशिबाला या मेळ नाही.

फाटक्या आमच्या नशिबाचा,
सांग रफू तरी होणार का?
अठरावर्ष दारिद्रय आमचे,
बघू आता तरी जाणार का?

भोकं पडलेल्या आयुष्याला,
ठीगळ कसं लावणार सांग?
सोनेरी सिंहासनावरच्या ,
दगडा कधी जागणार सांग?

तू नुसताच बस देवळात,
तुझ्या हाती तेच आहे.
तुझ्या अस्तित्वाच्या युद्धात,
आम्हाला मात्र पेच आहे.

मी केलाय बहिष्कार तुझा,
पक्का निर्णय झालाय माझा.
फोडणी बसेल त्यांनाच फक्त,
ज्यांनी धंदा मांडलाय तुझा......

गुरुवार, 23 फ़रवरी 2017

मी कसा असणार

*दगड धोंडी मी कसा असणार बरं वेड्या……*

देव देव म्हणत म्हणत
शेंदूर लावू नगं गड्या,
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

कुणी लावतोय दिवे
कुणी जाळतोय धूप
तेला धूराच्या वासानं
त्रास होतोय रे खूप
नको जाळू तेला संग
अगरबत्तीच्या काड्या
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

कुणी आनी पितांबर
कुणी भरजरी शालू
डोक्यावर ताज नको
नको कानी कुंडल घालू
यापरीस गरजूंना दे
धोतर आणि साड्या
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

कुणी शिंपडीतो दहीभात
कुणी शिंपडी गो मुत्र
कुणी अंथरीतो पायघडी
कुणी देई सोन्याचं छत्र
वाया नको घालू दहीभातं
नको टाकू पायघड्या
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

कुठं अंगारा कुठं भंडारा
उधळी कुणी अबीर गुलाल
भेव दाखवून जनतेला
माझे पैदा झालेत दलाल
दलालीच्या पैशांवर
बांधू लागलेत माड्या
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

मनन कर चिंतन कर
डोकं वापरून बघ थोडं
माझ्या वाचून तुझं कधी
अडणार नाही घोडं
कर्मच तारी माणसाला
नाही भाटाच्या त्या पुड्या
दगड धोंडी मी कसा
असणार बरं वेड्या……

संत श्री गाडगे बाबांच्या चरणी अर्पण🙏🏽

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
9592487310

मंगलवार, 21 फ़रवरी 2017

गोफण


गोफण

कोंबड्यानं दिली  बांग
जागा झाला सारा गाव
बापावाणी     पाखरांची
दिसे   शेताकडे    धाव

भल्या   पहाटे  निघतो
पिकाचिया  राखणिला
हाती घेऊनी   न्याहरी
गळा  टाकी गोफणिला

नजरेत         भरतोया
दाणा कणिसाचा भारी
पाखरांच्या थव्यांसाठी
त्याची रंगतच   न्यारी

रंगत लुटण्याला  सज्ज
झाली   पाखरांची टोळी
करू    पाहती   चोचीनं
त्याच्या सपानाची होळी
        
लई   फुलवावा    मळा
त्याच्या डोयाचं सपान
मुखी  देऊनी  भल्लरी
हाती  फिरवी   गोफण

गोफणिच्या    दगडाने
खगा  होऊ नये  पिडा
हाती हलक्या  भिरवी
बाप  गोफणिचा खडा

भोळ्या बापाची कहाणी
अ ड कली     गोफणित
घेते      गोफण  विसावा
पिकाचिया     कापणीत

दि.२२/०२/२०१७

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
9592487310

शनिवार, 11 फ़रवरी 2017

सत्तेचे डोहाळे

*सत्तेचे डोहाळे*

पडतात गळ्यात विजयश्रीच्या माळा,
सजतात काही वर्षे रोजंच मधुचंद्रासाठी अंथरूणे,
आणि चुरगळली जातात रोज आश्वासनांची फुले,
जी उधळली होती सत्तेत येण्याआधी………

कुरवाळलं जातं चाटे अन् बगलबच्च्यांना, एखाद्या श्रृंगाररत नारिच्या कुल्ह्यांनप्रमाणे,
आणि तुडवल्या जातात भावना जनतेच्या त्याच अंथरूणावर,
ज्यावर होतोय बलात्कार लोकतंत्राचा, आम्हीच निवडलेल्या काही नराधमांकडून……

पर्व संपत येऊ लागतं, खुर्चीचा भोग सरण्याची भीती दाटते,
तेव्हा पुन्हा लागतात *डोहाळे सत्तेचे*, उधळली जातात नव्यानं आश्वासनांची फुले,
लोकतंत्र पुन्हा सज्ज होतं बलात्कार करून घेण्यास,
लोकांनीच निवडलेल्या काही भामट्यांकरवी………

पण मतदारांनो ! आता मात्र विवेक वापरून वागा,
सन्मानानं जगा,
अन् सत्तेच्या लालच्यांना दावा त्यांची जागा.

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

गुरुवार, 2 फ़रवरी 2017

माणूस

माणूस

माणूस म्हणजे काय?
या कोड्यात मी पडायचो,
स्वतःमध्ये बदल करत मग
रोज नव्यानं घडायचो.

गल्ली गल्ली बोळाबोळातून
मी माणूस शोधत हिंडत आहे,
माणसाच्या शोधात माझं
आयुष्य मी सांडत आहे.

भेटेल कधीतरी माणूस म्हणून
धडपड कधी थांबली नाही,
माणसातला माणूस शोधतांना
स्वप्ने ही कधी लांबली नाही.

कुठं तरी फुलते आशा
पण उनीव थोडी राहून जाते,
माणसाच्या मुखवट्या आडंची
वाळवी आशेला खाऊन जाते.

सारं आयुष्य माणसातला
माणूस शोधन्यात गेलं,
सरते शेवटी माणसाला
भेटायचंच राहून गेलं.

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव.