मंगलवार, 17 जनवरी 2017

शेती

शेती

चाले  तिफन  तोऱ्यात
नाही  उसंत   मायंला
तिचा  जीव   लेकरात
झोका टांगला जुयेला

घंटी करे किंण-किंण
जणू   अंगाईच  गाई
बाप हाकतो   तिफन
चाडं राखते   विठाई

मुठ बिजाची  हातात
कमरेला बांधी ओटी
अनवाणी पायानं   गं
माय पेरे   पोटासाठी

काळी आई शिपं त्याची
बाप   शिपीतला   मोती
पिकासंग     मया   मंधी
बाप     पेरतोया    नाती

उरं  ढगांचा   फाटू  दे
शेती   बापाचा  नटू दे
हवं      तर     भगवंता
पान्हा मायंचा आटू दे

शनिवार, 7 जनवरी 2017

प्राजक्ताची फुले



प्राजक्ताची फुले त्यागतात देह,
अलगत वसुंधरेच्या कुशीत,
नआवाज करता…………
आणि पडतात निपचीत, सुगंधाला दाही दिशी भिरकावून लावत.……
वारा ही मुग्ध होऊन वाटत फिरतो त्यांचा गंध, जणू आपलीच मालमत्ता समजून………
आणि वसुंधरा ! ती तर लपवून घेते स्वतःचा चेहरा, लालपांढऱ्या फुलांच्या चादरी खाली मनोमन मुग्ध होत………

माहीत असतो स्वतःचा शेवट प्राजक्ताला, पण तरीही सढळ हाताने वाटून मोकळा होतो. सुगंधाची मौल्यवान नैसर्गिक देणगी, एक ही अश्रू न ढाळता…………